रोहितचं ठरलं! सलामी नव्हे, संघहित; कर्णधार पाचव्या स्थानावर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज

कर्णधार रोहित शर्मा पर्थवर दाखल झाल्यापासून सर्वांच्या मनात एक प्रश्न उभा राहिलाय. ऍडलेड कसोटीत सलामीला कोण उतरणार? अनेकांनी अंदाजही बांधले आहेत. काहींनी अंतिम संघही निवडलाय. नेहमीच संघहिताला प्राधान्य देणारा कर्णधार रोहित शर्मा गुलाबी चेंडूच्या दिवस-रात्र कसोटीत यशस्वी जैसवालसह के. एल. राहुललाच सलामीला पाठवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. तसेच पर्थप्रमाणे ऍडलेडवरही तिरंगा फडकावण्यासाठी गोलंदाजीचा तोच मारा कायम ठेवला जाणार आहे.

पर्थ कसोटीपूर्वी हिंदुस्थानी संघ ज्या स्थितीत होता ती स्थिती आता राहिलेली नाही. रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या अनुपस्थितीत यशस्वी जैसवालसह के. एल. राहुलला सलामीला पाठवण्याचे धाडस हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाने घेतले होते. तो धाडसी निर्णयही यशस्वी ठरला आणि हिंदुस्थानने पर्थ कसोटीही जिंकली. त्यामुळे जमलेल्या सलामीवीरांचा डाव बिघडू नये म्हणून यशस्वी-राहुल जोडीलाच ऍडलेडवरही सलामीला पाठवणार असल्याची रणनीती पुन्हा आखली जातेय.

जर राहुल सलामीला गेल्यावर रोहित स्वतः पाचव्या स्थानावर येऊन हिंदुस्थानची मधली फळी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल. रोहित कसोटीत जास्त काळ सलामीलाच खेळत असला तरी ऑस्ट्रेलिया दौरा हिंदुस्थानसाठी प्रतिष्ठेचा आहे. या मालिकेत रोहित आणि संघ नाहक कोणताही धोका पत्करून संघाला अडचणीत आणण्याच्या विचारात नाही. त्यामुळे शुबमन तिसऱ्या, विराट चौथ्या आणि मग रोहित पाचव्या क्रमांकावर खेळेल. रोहित आला असला तरी कुणाच्याही स्थानाला धक्का लावला जाणार नसल्याचे संघाच्या सूत्रांकडून कळले आहे.

पडिक्कल- जुरेलला वगळणार

देवदत्त पडिक्कलला रोहित आणि शुबमनमुळे संघात शेवटच्या क्षणी संधी लाभली होती. पण तो त्या संधीचे सोने करू शकला नाही. तसेच ध्रुव जुरेलही विशेष काही करू शकला नाही. परिणामतः या दोघांना संघातून वगळले जाणार हे निश्चित आहे. हे दोन बदल वगळता फलंदाजीत कोणताही बदल दिसणार नाही.

गोलंदाजीत बदलाची शक्यता कमीच

हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी पर्थवर कमाल केली होती. नितीश रेड्डी आणि हर्षित राणा या पदार्पणवीरांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामुळे वेगवान गोलंदाजीत बदलाची शक्यता कमीच मानली जात आहे. फिरकीवीर म्हणून संघात असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला केवळ एकच विकेट मिळवता आली. त्यामुळे त्याच्या जागी रवींद्र जाडेजाची वर्णी लावली जाऊ शकते, मात्र अश्विनला तूर्तास तरी अंतिम संघात स्थान मिळणे कठीण आहे. पर्थचा पराक्रम ऍडलेडवरही कायम ठेवण्यासाठी रोहित फार मोठे बदल न करताच उतरण्याच्या तयारीत आहे.

हिंदुस्थानी संभाव्य संघ – यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा/वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.