मी 2 मुलांचा बाप, कधी काय करायचं ते मला माहितीय! निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्मा स्पष्टच बोलला

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावस्कर मालिकेतील अंतिम सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात हिंदुस्थानचा संघ नियमित कर्णधार रोहित शर्माशिवाय मैदानात उतरला आहे. खराब फॉर्ममुळे रोहित शर्माला सिडनी कसोटीतून डच्चू देण्यात आला होता. मेलबर्नमध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला अशी चर्चा रंगू लागली. त्यानंतर सिडनी कसोटीसाठी त्याला अंतिम-11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर काढले की तो स्वत:हून संघाबाहेर बसला हा प्रश्न उपस्थित होत होता. याचे उत्तर आता रोहित शर्मा याने स्वत: दिले आहे.

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंच टाइमवेळी रोहित शर्माने स्टार स्पोर्टशी संवाद साधला. यावेळी रोहित म्हणाला की, सिडनी कसोटी न खेळण्याचा निर्णय माझा होता. सध्या माझ्या बॅटमधून धावा निघत नाहीय. त्यामुळे मी निवडकर्ते आणि मुख्य प्रशिक्षकांना सांगून सिडनी कसोटीतून माघार घेतली.

मी दोन मुलांचा बाप असून कधी काय करायचे हे मला चांगले माहिती आहे. हा सामना हिंदुस्थानसाठी महत्त्वाचा असून जे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत त्यांना संधी मिळावू म्हणून मी बाहेर बसण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे अवघड होता, पण योग्य होता. जास्त पुढचा विचार करणार नाही, पण आता संघहित कशात आहे हाच विचार होता, असेही रोहित म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, आता बॅटमधून धावा येत नाही, पण 2 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतरही येणार नाहीत याची गॅरंटी नाही. मी खूप मेहनत घेईल. पण हा निवृत्तीचा निर्णय नाही. मी निवृत्ती कधी घ्यावी हे लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरणार नाहीत.

संघातील सर्व खेळाडूंना माहितीय की गेमवर फोकस करायचा आहे.  2007 पासून मी संघात असून मला संघाला सामना जिंकून द्यायचा आहे. पण कधीकधी संघहितही महत्त्वाचे असते, असेही रोहित यावेळी म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)