
हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्माने हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू आणि मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी इंस्टाग्रामवर खास फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यानिमित्ताने रोहितने पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या ती पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर राहुल द्रविडसोबत ट्रॉफी हातात घेतलेला फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्या त्याने लिहिले आहे की, ‘प्रिय राहुल भाई, माझ्या भावना योग्य पद्धतीने पोहोचविण्यासाठी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला खात्री नाही की मी ते कितपत करू शकतो’.
‘माझ्या लहानपणापासून मी तुम्हाला अन्य कोट्यवधी लोकांप्रमाणेच पाहत आलो आहे. पण मी भाग्यवान आहे की मला तुम्हाच्यासोबत जवळून काम करता आले. तुम्ही या खेळातील दिग्गज आहात. मात्र तुम्ही तुमचं हे यश आणि कौतुक सर्व काही बाजूला सोडून आमच्याकडे प्रशिक्षक म्हणून आलात आणि आमच्यात मिसळून आमच्यातलेच झालात. तुम्ही इतकं खेळीमेळीचं वातावरण निर्माण केलं. आम्ही तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलू लागलो’.
View this post on Instagram
रोहितने पुढे लिहिले की, तुमच्यातली नम्रता आणि प्रेम ही आम्हाला मिळालेली भेट आहे. तुमच्याकडून बरेच काही शिकता आले आणि त्या प्रत्येक आठवणी स्मरणात राहतील. माझी बायको तुम्हाला माझी वर्क वाईफ बोलते आणि तुमच्या अशा या ओळखीसाठीही मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुमच्या दैदिप्यमान कारकिर्दीत वर्ल्ड कपने तुम्हाला हुलकावणी दिली होती. तुमच्या बरोबर वर्ल्ड कप पटकावता आला याचा अतिशय आनंद आणि समाधान आहे. राहुलभाई तुम्हाला माझा आत्मविश्वास, माझे प्रशिक्षक आणि माझे मित्र म्हणण्यात मी माझे भाग्य समजतो’.