संघहितासाठी कर्णधार रोहित शर्माने सलामीच्या स्थानाचा केलेला त्याग काहींना खटकला आहे. रोहितचे सहाव्या स्थानावर चाचपडत खेळणे संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. त्यामुळे रोहितच्या स्थानाबाबत क्रिकेटच्या दिग्गजांनी टीम इंडियावर सल्ल्यांचे हल्ले केले असून काहींनी रोहितला सलामीलाच खेळविण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींच्या मते तो सहाव्या स्थानावर संघाच्या डावाला बळकटी देईल. परिणामतः गॅबा कसोटीपूर्वी रोहितच्या स्थानाचा विषय पुन्हा पेटणार हे स्पष्ट झालेय.
सोमवारी रोहित शर्माच्या स्थानाबाबत सुनील गावसकर आणि रवी शास्त्राr यांनी गांभीर्याने दखल घेत त्याने सलामीलाच खेळावे, असा मोलाचा सल्ला टीम इंडियाच्या संघव्यवस्थापनासह रोहित शर्माला दिला होता. त्यामुळे हिंदुस्थानच्या अॅडलेड पराभवानंतर रोहितच्या फलंदाजीचा विषय राष्ट्रीय प्रश्न झाला आहे. एकीकडे गावसकर-शास्त्राRचा सल्ला तर दुसरीकडे हरभजन सिंगने रोहित शर्माचा अपयशी फॉर्म पाहता त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय धोकादायक ठरू शकतो, असे मत व्यक्त केलेय. रोहितचा गेल्या वर्षभरातील कसोटीतील खेळ पाहता त्याने वरच्या क्रमांकावर खेळू नये. अनेकांनी रोहितला सलामीचा पुन्हा सल्ला दिला असला तरी संघव्यवस्थापन त्याबाबतीत नक्कीच विचार करणार नसल्याचे हरभजन छातीठोकपणे म्हणाला. सलामीला यशस्वी जैसवाल आणि के. एल. राहुलनेच खेळावे, असेही हरभजन आवर्जून म्हणाला.
हरभजनच्या सल्ल्याप्रमाणे माजी वेगवान गोलंदाज डोड्डा गणेशनेही रोहितला सलामीला पाठवण्याचा विचार करणे नक्कीच संघहिताचे नाही. सध्या संघाची स्थिती पाहाता यशस्वी-राहुल हेच दोघे सलामीसाठी योग्य आहेत. आत्मविश्वास आणि धावांच्या कमतरतेमुळे रोहितला सलामीला पाठवण्याचा वरिष्ठांचा सल्ला मूर्खपणाचा असल्याचे मतही गणेशने बोलून दाखविला.
रोहित-विराटने घाम गाळला
धावांसाठी झगडत असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अॅडलेडच्या जखमा अॅडलेडला ठेवून एक दिवस आधीच गॅबाचा ताबा घेतला आणि फलंदाजीचा कसून सराव केला.
ब्रिस्बेन कसोटीत बदलाचे संकेत
अॅडलेड कसोटीतील अपयशामुळे ब्रिस्बेन कसोटीत हिंदुस्थानी संघात दोन बदलांचे संकेत सोमवारीच निवड समिती सदस्य जतीन परांजपे यांनी दिले होते. परांजपे यांच्या मतानुसार राणाच्या जागी आकाश दीप आणि अश्विनच्या जागी जाडेजा खेळू शकतो. चेतेश्वर पुजाराने मात्र अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा संघात घ्यावे, असा सल्ला दिला आहे. तसेच त्याने संघात हर्षित राणालाही कायम ठेवावे, असे सांगितले. संघाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रिस्बेनवर हर्षितच्या जागी आकाश दीपच्या गोलंदाजीला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे हरभजन सिंगने हर्षित राणाला वगळून आकाश दीपला खेळविण्याचे मत व्यक्त केलेय. त्यामुळे संघ व्यवस्थापन संघात बदल करणार हे निश्चित आहे. पण कोणत्या खेळाडूला अंतिम संघात स्थान मिळेल, हे आताच सांगणे कठीण आहे.