… तर रोहित स्वत:च कसोटीतून निवृत्ती पत्करेल! कृष्णम्माचारी श्रीकांत यांचे भाकीत

न्यूझीलंडविरुद्ध हिंदुस्थानी संघाचा झालेला पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आतापर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे चाहतेही प्रचंड चिडले असून त्यांनी या दोघांना खेळा नाहीतर निवृत्त व्हा असा निर्वाणीचा सल्ला दिला आहे. अवघ्या हिंदुस्थानातून उमटत असलेल्या प्रतिक्रिया पाहून माजी कसोटीपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी भाकीत वर्तवले आहे, जर हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला तर रोहित शर्मा स्वतःच कसोटीतून निवृत्ती जाहीर करेल.

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने या छोटय़ा फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो वन डे आणि कसोटी खेळतोय. त्याचा सध्याची फलंदाजी पाहाता त्याची कसोटी कारकीर्द फार बहरण्याची शक्यता कमीच आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अपयशानंतर त्याने स्वतःच आपल्या नेतृत्व क्षमतेतील चुका मान्य केल्या होत्या. एकीकडे हिंदुस्थानी संघाचे दारुण अपयश आणि रोहित वैयक्तिक कारणास्तव 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया पहिल्या कसोटीत खेळत नाहीय. त्यामुळेही त्याच्यावर टीका केली जात आहे. रोहितबाबत श्रीकांत यांनी ‘यूटय़ूब’वर आपले मत मांडताना स्पष्ट केले की, रोहितला आता आपल्या भविष्याबद्दल विचार करायला हवा. जर ऑस्ट्रेलियात त्याच्या बॅटमधून धावा नाही निघाल्या तर तो स्वतःच कसोटी क्रिकेटला कायमचा रामराम करेल. त्याचे वय वाढतेय, हे गोष्टही लक्षात ठेवायला हवी. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर आपण खराब नेतृत्व केल्याची कबुली दिली होती. याचा अर्थ तो आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करतोय, असेही श्रीकांत म्हणाले.

रोहित संघात खेळूच शकत नाही

रोहित शर्मा केवळ कर्णधार असल्यामुळे संघात आहे. जर तो कर्णधार नसता तर तो संघातही खेळू शकला नसता. त्याने गेल्या पाचही कसोटींत अत्यंत खराब कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतर त्याला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवणेच योग्य असल्याचे मतही समोर येतेय. रोहितने बांगलादेशविरुद्धच्या दोन आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तीन अशा एकंदर पाच कसोटींतील दहा डावांत 6, 5, 23, 8, 2, 52, 0, 8, 18, 11 अशा निराशाजनक खेळी करत 133 धावा केल्यात. या अपयशी फलंदाजीनंतर कोणताही खेळाडू संघात खेळू शकत नाही, पण रोहित संघात कायम आहे. पुढे त्याला कसोटी खेळायचे असेल तर आपल्या बॅटमधून धावाही कराव्या लागणार हे त्याने लक्षात ठेवायला हवे, असे मत क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.