IND vs AUS Test – रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, कमिन्सनं मामा बनवलं; ‘निवृत्तीची वेळ जवळ आलीय’, म्हणत नेटकऱ्यांनी डिवचलं

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानच्या संघाने ऑस्ट्रेलियाला 500 धावांच्या आत रोखले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 धावांमध्ये आटोपला. स्टीव्ह स्मिथने 140 धावांची मॅरेथॉन खेळी केली, तर कर्णधार पॅट कमिन्सने 49 धावांचे योगदान दिले. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने 3, आकाशदीपने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली.

ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या रोखल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हिंदुस्थानला चांगली सुरुवात करून देतील अशी अपेक्षा होती. मेलबर्नची खेळपट्टीही फलंदाजीला साथ देत असल्याने रोहितची बॅट तळपणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र रोहितने पुन्हा एकदा माती खाल्ली आणि कमिन्सच्या चेंडूवर तो बाद झाला. रोहितने 5 चेंडूत अवघ्या 3 धावा केल्या.

रोहित बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेला केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांची काही काळ जोडी जमली. ही जोडी हिंदुस्थानचा डाव सावरेल असे वाटत असताना पुन्हा एकदा कमिन्सने झटका दिला. एका वेगवान चेंडूवर राहुल बोल्ड झाला आणि हिंदुस्थानला दुसरा धक्का बसला. बाद होण्यापूर्वी राहुलने 42 चेंडूत 24 धावांची खेळी केली. बातमी अपलोड होईपर्यंत हिंदुस्थानच्या 2 बाद 59 धावा झाल्या होत्या. यशस्वी 29 आणि विराट कोहली 2 धावांवर नाबाद आहे.

एकही मोठी खेळी नाही

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्याला रोहित शर्मा मुकला होता. मात्र तो संघात परतला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सलामीला येण्याऐवजी तो मधल्या फळीत खेळला. मात्र तिथेहगी त्याची फलंदाजी सुमार राहिली. अ‍ॅडलेड कसोटीत त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 6 धावा केल्या होत्या. तर ब्रिस्बेनमध्ये पहिल्या डावात 10 धावा केल्या होत्या. आता मेलबर्नमध्येही पहिल्या डावात तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला. त्याचा खराब फॉर्म आता हिंदुस्थानसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

मागच्या 14 डावात 12 ची सरासरी

रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त कर त्याच्या निवृत्तीची वेळ जवळ आली आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्याला कारण ठरले आहे रोहितची गेल्या 14 डावातील सरासरी. रोहितने गेल्या 14 डावात 11.07 च्या सरासरीने फक्त 155 धावा केल्या आहेत. यात त्याने एकदाच 50 धावांचा आकडा पार केला असून 52 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. तब्बल 10 वेळा तो एकेरी धावसंख्येवर बाद झालेला आहे.