
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना पार पडला होता. सामना सुरू असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंना उद्देशून ‘कोई गार्डन मैं नहीं घूमेगा’ अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. स्टंपमधील माईकमध्ये रोहित शर्माचं हे वक्तव्य रेकॉर्ड झाल्यामुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. आजही यावर अनेक मीम्स तयार केल्या जात आहेत. त्या वक्तव्याबद्दल रोहित शर्माने आपली भुमिका जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केली आहे.
जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, विशाखापट्टणमध्ये सामना होता. मी पाहिलं की खेळाडू गार्डनमध्ये फिरत असल्यासारखे फिरत होते. सामना खूप महत्त्वाचा होता आणि आम्हाला जिंकायचा होता. त्यामुळे सकाळीच मी खेळाडूंना सांगितलं होतं की, आपल्याला आणखी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. पण, ते सर्व निवांत होते. कोणीही फिल्डवर पळताना दिसतं नव्हतं. पहिले दोन-तीन ओव्हर मी पाहून घेतलं आणि त्यानंतर बोललो की तुम्ही अशा पद्धतीने क्रिकेट नाही खेळू शकतं. फलंदाजांनी चांगली भागी केली होती, मी विकेट मिळवण्यासाठी उत्सुक होतो. अशा वेळी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असतात. परंतु तेव्हा प्रत्येकजण स्वत:मद्ये व्यस्त असल्याचे मी पाहिलं आणि ते मला आवडलं नाही, असे रोहित म्हणाला आहे.