Rohit Sharma Retirement : विराट पाठोपाठ रोहितचाही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम, निवृत्तीची घोषणा

शेवटपर्यंत उत्कंठा ताणून ठेवणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला आणि देशभरात जल्लोष सुरू झाला. हाच जल्लोष सुरू असताना फायनलमध्ये अर्धशतकीय खेळी करत सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या विराट कोहलीने आणि त्यापाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला अलविदा केला.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, हा माझा अखेरचा टी-20 सामना होता. क्रिकेटच्या या फॉरमॅटला रामराम करण्याची याहून चांगली वेळ असू शकत नाही. या फॉरमॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला. याच फॉरमॅटद्वारे मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि मला हेच हवे होते. मला हा वर्ल्डकप जिंकायला होता.

रोहित शर्मा याने 159 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले. यात त्याने 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राईक रेटने 4231 धावा केल्या. त्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 5 शतकांची आणि 32 अर्धशतकांची नोंद आहे. 2007मध्ये टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला तेव्हा रोहितही त्या संघाचा भाग होता आणि आता कॅप्टन म्हणून त्याने 2024 चा वर्ल्डकप उंचावला.

विराटची निवृत्ती

दरम्यान, रोहित शर्माआधी विराट कोहली याने निवृत्तीची घोषणा केली. फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर विराट म्हणाला की, आता नव्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्डकप आणि टीम इंडियासाठी अखेरचा टी-20 सामना होता. आम्हाला वर्ल्डकप उंचावायचा होता आणि आम्ही ते केले. हे एक खुले गुपित होते. सामना हरलो असतो तरी मी ते जाहीर करणारच होतो.

‘आयसीसी’ ट्रॉफीच्या जेतेपदाचा षटकार

हिंदुस्थानने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983चा वर्ल्ड कप जिंकून हिंदुस्थानी क्रिकेटचा पहिला सोनेरी अध्याय लिहिला. त्यानंतर तब्बल दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानला ‘आयसीसी’चे जेतेपद मिळाले होते. 2002मध्ये श्रीलंकेसोबत हिंदुस्थानने ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’वर नाव कोरले होते. ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ची फायनल पावसात वाहून गेल्याने उभय संघाना संयुक्त जेतेपद बहाल करण्यात आले होते. मग 2003च्या वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव होऊन सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानला उपविजेतेपद घेऊन मायदेशी परतावे लागले होते. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली  हिंदुस्थानने 2007मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडविला. मग हिंदुस्थानने चारच वर्षांनंतर मायदेशातील वन डे वर्ल्ड कप नावावर करण्याचा पराक्रम केला. 2011च्या या वनडे वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानने श्रीलंकेचा पराभव करीत झळाळत्या करंडकावर नाव कोरले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर हिंदुस्थानने नाव कोरले. त्यावेळीही संघाची धुरा एमएस धोनी याच्या खांद्यावर होती. मग 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार पत्करावी लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. धोनीच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघाने वन डे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलेय. हिंदुस्थानकडे दोन वन डे वर्ल्ड कप, एक टी-20 वर्ल्ड कप आणि दोन चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद होते. मात्र, 2013नंतर हिंदुस्थानी संघाला आयसीसी चषकावर नाव कोरता आलेले नव्हते. गतवर्षी मायदेशात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागल्याने टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.