‘माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 2019मध्ये केला आहे. मात्र, पार्थचे वडील अजित पवार स्वतः बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. आधी वडीलधाऱया शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱयांचा प्रचार वडील अजितदादा करीत आहेत. पार्थचा पराभव पचवून नव्हे, तर अजितदादा आपले साम्राज्य ईडीपासून वाचण्यासाठी बारणे यांचा प्रचार करताहेत. मात्र, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय,’ अशी प्रतिज्ञाच रोहित पवार यांनी घेतली.
‘मावळ ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. या भूमीने स्वाभिमान राखला आहे. मावळमध्ये परिवर्तन होईल. स्वाभिमानी नागरिक गद्दारीला धडा शिकवतील,’ असे बोलत आमदार पवार पुढे म्हणाले, ‘ही विचारांची लढाई आहे. गद्दाराला धडा शिकवायचा आहे.’
पार्थच्या मागे-पुढे रणगाडे द्या!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. याबद्दल आमदार पवार म्हणाले, ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार, नेत्यांना आणि त्यांच्या मुलांना सुरक्षा देतात. मात्र, जेथे कोयता गँग सामान्य नागरिकांवर हल्ले करतात, महिलांवर अत्याचार होतात, यासाठी ते काहीच करीत नाहीत. पार्थ यांना ‘वाय’ नव्हे, तर ‘झेड’ सुरक्षा द्यावी; एवढेच काय, पुढे-मागे दोन रणगाडे द्यावेत,’ असा टोलाही पवार यांनी लगावला.