विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे! मिंधे सरकारनं स्वागताच्या पोस्टरवरून टीम इंडियाच गायब केली

विश्वचषक जिंकलेल्या हिंदुस्थानच्या संघात असलेल्या मुंबईतील खेळाडूंचा विधान भवनात आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने विधानभवनाच्या बाहेर मिंधे सरकारने पोस्टरबाजी केली आहे. खेळाडूंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टवरून खेळाडूंनाच गायब करून मिंध्यांनी स्वत:चीच चमकोगिरी केली. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकावर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी एक्स अकाऊंटवरून विधानभवनाच्या बाहेर लावण्यात आलेल्या स्वागताच्या पोस्टरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या स्वागताच्या पोस्टवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यात आला आहे. मात्र ज्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे त्यांना मात्र यात स्थान देण्यात आलेले नाही. यावरून वडेट्टीवार यांनी मिंधे सरकारला घेरले.

“या तिघांचं काय योगदान? विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे! विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघात असलेल्या मुंबईतील खेळाडूंचा विधान भवनात आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सत्कार सोहळ्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर मध्ये एक तरी खेळाडू दिसतोय का? घेणं न देणं फक्त क्रेडिट घेण्याची घाई!”, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

रोहित पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही माध्यमांशी बोलताना यावर टीका केली. टीम इंडियाने हा वर्ल्डकप जिंकला असून सभागृहाच्या वतिने विधानभवनाच्या बाहेर फोटो लावायला हवा होता. आत बसणारा आमदार कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचे या देशावर आणि टीमवर प्रेम आहे. टीमने मिळून हा वर्ल्डकप जिंकला. मात्र या सरकारला फक्त पोस्टरबाजी माहिती आहे. या पोस्टवरून टीम इंडियाच गायब केली आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. यातही राजकारण करणे कितपत योग्य आहे? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.