Kurla bus accident: सत्तांध सरकारला याकडं लक्ष द्यायला वेळ नाही! रोहित पवारांचा निशाणा

rohit pawar on best bus accident

 

मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री भरधाव वेगातील बेस्टच्या एसी बसने अनेक गाड्यांसह पादचाऱ्यांना उडवलं. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 43 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख पटली असून यात तीन महिलांचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेवरून विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला घेरलं आहे. हा अपघात सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी X वरील अधिकृत अकाउंटवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्ट मध्ये या अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासोबतच जखमी झालेले बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.

आपल्या पोस्ट मध्ये रोहित पवार पुढे लिहितात की, ‘कंत्राटी भरतीविरोधात आम्ही कायम आवाज उठवत आलोय, पण सत्तांध सरकारला याकडं लक्ष द्यायला वेळ नाही. अखेर मुंबईत बेस्टमधील याच कंत्राटी चालकाकडून झालेल्या अपघातात सात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आणि पंचवीसहून अधिक नागरिक जखमी झाले. #कंत्राटी_भरती केली नसती तर अनुभव नसलेल्या चालकाला बस चालवण्यास देण्याची वेळ आली नसती आणि असा भीषण अपघात होऊन त्यात पाच जणांचे जीव गेले नसते. त्यामुळं आतातरी सरकारने कंत्राटी भरतीचा हट्ट सोडून नियमित भरती करावी आणि प्रशिक्षित असलेल्या चालकांच्याच हाती स्टेअरिंग द्यावं’.