
“पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते, कारण आपण आजकाल काय बोललो हे लोकांना लक्षात राहत नाही’’ अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावरून फडणवीस यांना चांगलेच सुनावले आहे. जनतेला शॉर्ट मेमरी म्हणणे फडणवीसांच्या अहंकाराचा कळस आहे. हा महाराष्ट्र तुमच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. “एखाद्या योजनेचे दीड हजार रुपये दिले म्हणजे तुमच्या सरकारने केलेली पापे, भ्रष्टाचाराचे कारनामे, सत्तेची मस्ती, महाराष्ट्राच्या अस्मितेचे तोडलेले लचके आणि त्यातून महाराष्ट्राला झालेला मनस्ताप महाराष्ट्राचा शेतकरी, युवा, महाराष्ट्राची जनता विसरेल, असा तुमचा समज असेल तर मग महाराष्ट्र तुम्हाला अजून कळलेलाच दिसत नाही.’’ असे रोहित पवार यांनी त्यात नमूद केले आहे.