बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडवर मकोका लावावा अशी मागणी करण्यासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु केले आहे. धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपयशी ठरले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही शिवाय गुन्हेगारांपेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
”मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं. राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही शिवाय गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल हेही लक्षात असू द्या”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.