एका चिल्लर माणसाला वाचवण्यासाठी गृहखात्याने केलेला थिल्लरपणा उघड, रोहित पवार यांनी फटकारले

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे कोरटकरवर अटकेटी टांगती तलवार असतानाच शनिवारी त्याचे दुबईतले फोटो व्हायरल झाले. त्या फोटोवरून दुबई कोरटकरला पळून गेला की काय अशी शक्यता वर्तविण्यत येत आहे. त्यावरून सध्या विरोधकांनी फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून गृह मंत्रालयाला फटकारले आहे.

”छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा कोरटकर देशाबाहेर दुबईला पळून गेला की पळवून लावला? रोल्स रॉयल फिरवणारा हा चिल्लर कोरटकर प्रायव्हेट जेट ने गेला की साध्या विमानाने गेला? राज्यकर्त्यांचा मित्र असल्याने सगळ्या यंत्रणा कोरटकरच्या घरगडी असल्यासारख्या वागल्या हे आता स्पष्ट झाले आहे. एका चिल्लर माणसाला वाचवण्यासाठी गृहखात्याने केलेला थिल्लरपणा आता उघड झाला असून सरकारने यावर तत्काळ स्पष्टीकरण द्यावे”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.