शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वणी येथे निवडणूक आयोगाने बॅगा तपासल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी भाजप मिंधे सरकारला व निवडणूक आयोगाला फटकारले आहे. ”उद्धव साहेबांच्या बॅगा चेक करून प्रशासनाच्या हाती निराशा लागली असली तरी प्रशासनाने महायुतीच्या नेत्यांचे तसेच गुजरात आणि दिल्लीतून येणारे हेलीकॉप्टर आणि विमाने चेक केल्यास प्रशासनाच्या हाती निराशा लागणार नाही हे नक्की”, असा टोला रोहीत पवार यांनी महायुती व निवडणूक आयोगाला लगावला आहे.
”उद्धव ठाकरे साहेबांच्या बॅगा चेक करून प्रशासनाच्या हाती निराशा लागली असली तरी प्रशासनाने महायुतीच्या नेत्यांचे तसेच गुजरात आणि दिल्लीतून येणारे हेलीकॉप्टर आणि विमाने चेक केल्यास प्रशासनाच्या हाती निराशा लागणार नाही हे नक्की आहे. हे दळभद्री सरकार महाराष्ट्राच्या युवांना रोजगार तर देऊ शकलं नाही, परंतु हेलीकॉप्टर चेक करण्याच्या निमित्ताने मध्यप्रदेशच्या कॅमेरामॅनला मात्र रोजगार देत आहे, याचा आनंद आहे”, असे रोहीत पवार यांनी ट्विट केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती आणि विराट प्रचार सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि होणारी गर्दी पाहून सत्ताधाऱ्यांना धडकी भरली आहे. हे अधोरेखित करणारा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.