सावधान! पुण्यात सरकार पुरस्कृत कोयता गँग सक्रिय, रोहित पवार यांची टीका

उसन्या पैशाच्या वादातून कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकाऱ्याने कोयत्याने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी येरवडा भागात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

”पुण्यातील येरवडा येथील घटना बघता, सावधान पुण्यात सरकार पुरस्कृत कोयता गँग सक्रिय आहे. लाडक्या बहिणींनी स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी” असे म्हणावे लागेल. कडक कारवाई करू,कोणाला सोडणार नाही असले बोलबच्चन देणारे सरकार कोयता गँगवर कारवाई करणार आहे आहे की नाही? असा सवाल या पोस्ट मधून रोहित पवार यांनी सरकारला केला आहे.

शुभदा शंकर कोदारे वय 28 , रा. बालाजी नगर, कात्रज असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर) याला येरवडा पोलिसांनी अटक केली. शुभदा मूळची सातारची होती. ती डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीत कामाला होती. त्याच कंपनीत आरोपी कृष्णा कामाला असल्याने दोघांची ओळख होती. त्यांच्यात उसन्या पैशावरून वाद झाले होते. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारात शुभदा काम संपवून वाहनतळावर आली. त्यावेळी तेथे थांबलेल्या कृष्णाने तिच्याशी वाद घालून कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.