आता विद्यार्थ्यांच्या मागेही ED, CBI, IT चौकशीचा ससेमिरा लावतात की काय? गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून रोहित पवारांचा सवाल

जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडायची वेळ आली आहे. अशा स्थितीत शिक्षकांनी नुसते हातावर हात ठेऊन बसू नये, तर आम्ही राजकारणी जसे पक्ष फोडतो तसे तुम्हीही इंग्रजी माध्यमातील पोरं फोडा, असा अजब सल्ला मिंधे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना दिला. याचा व्हिडीओही व्हायरल झाला असून विरोधकांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून गुलबाराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. ईडी, सीबीआय, आयटी चौकशीचा ससेमिरा लावून जसे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि महाविकास आघाडीचे सरकार पाडले, तशा चौकशीचा ससेमिरा विद्यार्थ्यांच्या मागे लावणार का, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषन ब्युरो, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय. मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.