भाजपाने विधानसभा निवडणुकीत जाती-जातीत विष कालवण्याचे काम केले. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला. एका- एका बूथसाठी दहा लाख रुपये खर्च केला, तरीही कर्जत-जामखेडच्या स्वाभिमानी जनतेने मला विजयी केले, असा हल्लाबोल नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी केला.
अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांच्या विजयानिमित्त आज जामखेड शहरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी जामखेड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन आभार मानले. कुसडगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपाने पैसा, दडपशाही केली, जाती-जातीत वाद निर्माण केला; पण सामान्य जनता माझ्याबरोबर राहिली.
नागरिकांचा निकालावर विश्वास नाही
भाजपा सरकारविरोधात सध्या वातावरण असताना त्यांचा मोठा विजय झाला. ज्यांना निवडून येण्याची खात्री नव्हती ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा या निकालावर विश्वास नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
ईव्हीएमचे पोस्ट मॉर्टेम व्हावे
सत्ताधारी, विरोधी पक्ष, जनता, निवडणूक आयोग व मीडियासमोर दूध का दूध व पाणी का पाणी व्हावे, सर्वांसमोर ईव्हीएमचे पोस्ट मॉर्टम व्हावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
कर्जत-जामखेड मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल जामखेडमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी भव्य विजयी रॅलीचं आयोजन केलं होतं. उपस्थितांनी गुलालाची मुक्त उधळण करत हा आनंदोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी जामखेडकर जनतेचं अलोट प्रेम अनुभवायला… pic.twitter.com/RBQk6tztCI
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 3, 2024
ही तर लोकशाहीची हत्या
मारकडवाडी येथील आजच्या मतपत्रिकेवरील मतदानाविषयी विचारले असता रोहित पवार म्हणाले, गावातील लोकांवर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही सुरू आहे. ही तर लोकशाहीची हत्या आहे. सर्वसामान्य नागरिकांना ईव्हीएमविषयी शंका असून, बॅलेट पेपरवर मतदान घेऊन द्यावयास हवे होते. लोकशाहीमध्ये नागरिकांना असलेला संशय दूर करणे हे काम निवडणूक आयोग आणि प्रशासनाचे आहे. त्याऐवजी मारकडवाडीमध्ये पोलीस तैनात करून नागरिकांवर दहशत करण्यात आली. मात्र, भविष्यकाळात अनेक गावांत मारकडवाडीप्रमाणे नागरिक लोकशाही पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेण्याची शक्यता आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.