महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची दहशत असून काही लोक त्यांच्यावर नाराज आहेत. परंतु लोक समोर येऊन बोलत नाहीत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज नागपुरात केला. राज्यात महाविकास आघाडीला सर्वच ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत असून आमच्या जवळपास 170 जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पूर्व नागपूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारार्थ रोहित पवार नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर आता भाजपचा गड राहिला नाही. लोक देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असून त्यांची राज्यात आणि त्यांच्या शहरातही दहशत आहे, असे रोहित पवार म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग सुरक्षा यंत्रणांनी तपासली. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या बॅगाही तपासा, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. त्यामुळेच सत्ता पक्षातील नेत्यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक आयुक्त करायला लागले आहेत. ज्या लोकांनी बॅग तपासली त्यांना अभिनंदन पत्र निवडणूक आयोगाने दिले ही चांगली गोष्ट आहे. पण बॅग न तपासणाऱयांवर काय कारवाई केली? ते पत्र समोर यायला हवे, असेही पवार म्हणाले.
अजित पवार खोटे बोलतात
आपल्या हातातून निवडणूक जात असल्यामुळे कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे अनेकदा खोटे बोलून वेळ मारून न्यावी लागते. तसे अजित पवार यांचे झाले आहे. खोटे बोलून आपले उमेदवार निवडून यावे असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, असे रोहित पवार म्हणाले.