![rohit pawar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/rohit-pawar-696x447.jpg)
”गेली दहा वर्षे मुख्यमंत्र्यांना (अरविंद केजरीवाल) अनेक अडथळ्याची शर्यत पार करावी लागली, पण आता किमान मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल हे पायात पाय न घालता हातात हात घालून काम करतील आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील, ही अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. तर भाजप 27 वर्षांनी दिल्लीत सत्तेत आली आहे. यावरच भाष्य करताना रोहित पवार X वर पोस्ट करत असं म्हणाले आहेत.
रोहित पवार म्हणाले आहेत की, ”दिल्ली विधानसभेचा निकाल हा धक्कादायक आहे. आम आदमी पक्षाने आणि विशेषतः मनीष सिसोदिया यांच्यासारख्या निरलस व्यक्तीमत्त्वाने सामान्य माणसासाठी शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात देशात कुठंही झालं नाही, असं डोंगराएवढं काम दिल्लीत उभं केलं. तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागत असेल तर निवडणुकीच्या राजकारणातून विकास हद्दपारच होईल आणि नेतेही विकासकामं करणं सोडून केवळ द्वेषाचंच राजकारण आणि इव्हेंटबाजीच करतील की काय, याची भीती वाटते.”
ते पुढे म्हणाले, ”या निकालाने विकास करावा की नाही, असा प्रश्न पडला तर, तो चुकीचा ठरणार नाही. एकीकडे विकास तर दुसऱ्या बाजूला सत्ता, संपत्ती आणि गुंडगिरी, या पर्यायात विकासाचा पराभव झाला आणि यामुळं सामान्य माणसालाच अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, याचं अधिक दुःख वाटतं.”