पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते! फडणवीसांचं विधान अहंकाराचा कळस; रोहित पवारांनी सुनावलं

पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांमध्ये जोश संचारावा म्हणून वादग्रस्त विधान केले. पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते. काल काय बोललो हे लोकांच्या आज लक्षात रहता नाही, असे फडणवीस म्हणाले. या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी समाचार घेत फडणवीस यांना चांगलेच सुनावले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते, कारण आपण काल काय बोललो, हे आज लोकांना लक्षात राहत नाही,” हे आपलं वक्तव्य म्हणजे अहंकाराचा कळस आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारे शॉर्ट मेमरी म्हणणे महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, एखाद्या योजनेचे 1500 रु दिले म्हणजे तुमच्या सरकारने केलेली पापं, भ्रष्टाचाराचे कारनामे, सत्तेची मस्ती, महाराष्ट्राच्या अस्मितेचे तोडलेले लचके आणि त्यातून महाराष्ट्राला झालेला मनस्ताप महाराष्ट्राचा शेतकरी, युवा, महाराष्ट्राची जनता विसरेल, असा तुमचा समज असेल तर मग महाराष्ट्र तुम्हाला अजून कळलेलाच दिसत नाही.

निवडणुकीच्या तोंडावर योजना का आणल्या? हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला माहीत आहे. हा महाराष्ट्र आहे, मध्यप्रदेश नाही. त्यामुळे तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.