गुन्हेगारांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा धर्म, माणिकराव कोकाटेंवरू रोहित पवार यांचा घणाघात

माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने फसवणूक आणि कागतपत्रांच्या फेरफारप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण त्यांच्या आमदारकी रद्द करण्याचे पत्रक निघाले नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदंचद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा धर्म आहे अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, विरोधी पक्षाच्या आमदाराला न्यायालयाने शिक्षा सुनावली असती तर लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत काल संध्याकाळीच संबंधित आमदाराची आमदारकी रद्द करण्याचे पत्रक निघाले असते, परंतु ही तत्परता किंवा कुठलेही कायदे सत्ताधाऱ्यांना लागू होत नाहीत म्हणूनच तर मस्साजोग, परभणी प्रकरण असो वा राहुल सोलापुरकरचे प्रकरण असो तपास कधी पुढे सरकतच नाही.

तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालत भ्रष्टाचाराला खतपाणी घालून अंतिमतः सत्ता हाच सत्ताधाऱ्यांचा धर्म आणि कर्म असल्याने सत्ताधारी कोणत्याही गुन्हेगारांवर कारवाई करू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे असेही रोहित पवार म्हणाले.