सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का? रोहित पवार यांचा सवाल

बीड आणि परभणी प्रकरणाचा तपास थांबला आहे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का असा सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, बीड आणि परभणी दोन्ही प्रकरणात तपास एका पॉइंटला येऊन थांबला असून तपास आता गती घ्यायला तयार नाही. बीड प्रकरणात सभागृहात मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन तपासणी करण्याची घोषणा करुन 25दिवस झालेत पण अद्यापही समिती कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का?

तसेच विष्णू चाटे या आरोपीचा मोबाईल सापडला तर सर्वकाही समोर येणार आहे, परंतु या आरोपीचा मोबाईल अजूनही सापडत नाही. विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा CDR सुद्धा का मिळत नाही? हे पोलीस यंत्रणेचे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांचे अपयश नाही का? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.

राज्यकर्त्यांनी मिळमिळीत भूमिका बघता जनतेचा कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत असल्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपली कार्यक्षमता तर अजितदादांनी आपला निडरपणा दाखवायला हवा. वजीराच्या बेशिस्त प्याद्याला वाचवण्यासाठी राजानेच कायद्याची मोडतोड करून संपूर्ण राज्यालाच वेठीस धरायचे नसते आणि ते राज्याच्या हिताचेही नसते, याचे स्मरण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी ठेवायला हवे असेही रोहित पवार म्हणाले.