धनंजय मुंडेंना भाजपचे पाठबळ, नाराज होऊ नये म्हणून मुख्य कमिटीत स्थान

माझ्यावर विरोधी पक्षाने आरोप केल्यानंतर मी स्वतःहून नैतिकता जपत राजीनामा दिला होता, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सांगितले आहे. मात्र, धनंजय मुंडे यांना भाजपचे पाठबळ मिळाल्यामुळे ते माघार घेत नाहीत. नैतिकदृष्ट्या राजीनामा देत नाहीत. अजित पवार यांचे ते ऐकत नाहीत. मुंडे नाराज होऊ नयेत यासाठी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मुख्य कमिटीमध्ये त्यांना घेतले, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

रोहित पवार म्हणाले, बीड प्रकरणांमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्या दुर्दैवी आहेत. सूर्यवंशी, देशमुख कुटुंबाला न्यायाची अपेक्षा होती. मात्र सरकारने फक्त  त्यांना आश्वासने दिली आहेत. भाजपचेच एक आमदार ज्या ठिकाणी सामाजिक सभा होत होत्या, त्या ठिकाणी जाऊन मोठी भाषणे देत होते.

उद्या हे लोक ‘कुत्रा ऑपरेशन’ सुरू करतील

राज्यात सध्या ‘टायगर ऑपरेशन’ सुरू आहे. उद्या हे लोक ‘मांजर ऑपरेशन’, ‘कुत्रा ऑपरेशन’ सुरू करतील, अशा शब्दात रोहित पवार यांनी मिंधे गटाची खिल्ली उडवली. एखाद्या संग्रहालयात खूप सारे वाघ एकत्र ठेवले तर ते भांडण करतात. कुत्री एकत्र ठेवल्यास त्यांच्यामध्येही भांडणे होतात. तसेच राज्यातील सरकारमधील तिन्ही वाघ आपल्याला भांडतानाच जास्त दिसत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.