ज्याला गुजराती जमते त्यालाच नोकरी हे सरकारचे धोरण आहे का? आमदार रोहित पवार यांचा सवाल

ज्याला गुजराती जमते त्यालाच नोकरी हे सरकारचे धोरण आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला केला आहे. धारावी नोकरी मेळाव्याबाबत गुजराती भाषेत ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जचा फोटो रोहित पवार यांनी ट्विट केला आहे.

महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला विरोध करून इतर भाषेचा आग्रह धरणे म्हणजे खाल्ल्या मिठाला न जागण्याचा प्रकार आहे. भाजप नेत्यांकडून वारंवार मराठीची गळचेपी होत असताना आता भैयाजी जोशींचे गुजराती प्रेम ओसंडून वाहिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. खुद्द महाराष्ट्र शासनच गुजराती भाषेत एखाद्या कार्यक्रमाची जाहिरात करत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका काय? सरकार मराठी भाषेबाबत उदासीन आहे हेच सिद्ध होत आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे.