शिवस्मारक होऊ नये म्हणून कुणाचा दबाव तर नाही ना? रोहित पवारांनी उपस्थित केली शंका

अरबी समुद्रात 8 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन झाले होते. पण या स्मारकाची एक वीटही अद्याप रचली गेली नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केले आहे. तसेच हे स्मारक होऊ नये म्हणून कुणाचा दबाव तर नाही ना अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की,अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जलपूजन होऊन 8 वर्षे झाली तरी देखील स्मारकाची एक वीट देखील रचली गेली नाही. यासंदर्भात जुलै 2022 मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्र दिले पण त्यांचा काहीही प्रतिसाद आला नाही.वर्षभराने जुलै 2023 मध्ये तत्कालीन राज्यपाल महामहीम श्री.बैस साहेबांची भेट घेऊन त्यांना याविषयी लक्ष घालण्याची विनंती केली असता त्यांनी मात्र मुख्य सचिवांना त्वरित लक्ष घालण्याचे आदेश दिले, परंतु तरीदेखील सरकारने आपली निष्क्रियता सोडलीच नाही.यावरून सरकार किती गंभीर आहे ते स्पष्ट होते.

असो, राज्य सरकारने समन्वय साधला असता तर स्मारक नक्कीच झाले असते ना? नर्मदा नदीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकास कोणत्याही अडचणी येत नाहीत पण अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकासच अडचणी का येतात ? हे स्मारक होऊ नये यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना ? असे कितीतरी प्रश्न सर्वसामान्य शिवप्रेमींना पडल्याशिवाय राहत नाही. यावर सरकार उत्तर देईल, ही अपेक्षा, असे रोहित पवार म्हणाले.