रोहित, बुमराहला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’साठी नामांकन

धडाकेबाज सलामीवर रोहित शर्मा आणि अन आग्या वेताळ  गोलंदाज जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या जगज्जेतेपदाचे खरे शिल्पकार ठरले. टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील याच लक्षवेधी कामगिरीच्या जोरावर या दोघांना जून महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ हा मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने 36.71 च्या सरासरीने आणि 156.70च्या स्ट्राइक रेटने 257 धावा फटकावित स्पर्धेतील दुसऱया क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूंत 92 आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत 39 चेंडूंत 57 धावांची लयलूट केली होती. दुसरीकडे, वर्ल्ड कपमधील ‘मालिकावीरा’चा बहुमान मिळविणाऱया जसप्रीत बुमराहने आठ सामन्यांमध्ये 15 बळी टिपले. पाकिस्तानविरुद्धचा महत्त्वपूर्ण स्पेल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये मोक्याच्या वेळी बळी टिपत हिंदुस्थानच्या विजयात बहुमोल योगदान दिले. त्यांच्यासोबत अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज जो 281 धावांसह अव्वल स्थानी आहे, त्यालासुद्धा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.