
डोळ्यांसमोर बाराही महिने दुथडी भरून कुंडलिका नदी वाहत असताना तिरावरील २६ गावांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे रोह्यातील जलवाहिन्यांवर पाणीमाफियांनी दरोडा टाकला आहे. त्यामुळे अपुरा त्यातच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी वर्षानुवर्षे वणवण करावी लागत आहे. याविरोधात २६ गावांतील महिलांनी आज तहसील कार्यालयावर धडक देत सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. पाणीटंचाईचा मार्ग निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, पाणीमाफियांवर कारवाई करा, अशा घोषणा देत महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
रोहे तालुक्यातील खारापटी, झोळांबे, डोंगरी, वावेपोटगे, यशवंतखार, धोंडखार या मोठ्या गावांसह अन्य २६ गावांमध्ये वर्षातील सहा ते सात महिने भीषण पाणीटंचाई असते. डिसेंबर महिना सुरू होताच गावागावात प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत मिळणारे पाणी तुटपुंजे असल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. रोहा एमआयडीसीतील कारखान्यांनी कुंडलिका नदीतील पाणी प्रदूषित करून टाकले आहे. त्यामुळे एमआयडीसीने जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून २६ बाधित गावांसाठी पाणीपुरवठा योजना सुरू केली. यातून दररोज २२ लाख लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर अनधिकृतपणे अनेकांनी जोडण्या घेतल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
१४ वर्षे झाली तरी टंचाईचा वनवास संपत नाही
अनेक ठिकाणी जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या टाक्या त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी पोहोचत नाही. जलवाहिन्यांवर पाणीमाफियांनी अक्षरशः दरोडा टाकला आहे. या माफियांना राजकीय पाठबळ असल्यामुळे कुणीही या माफियांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे २६ गावांतील रहिवासी गेल्या १४ वर्षांपासून तहानलेले आहेत.