समुद्रात बुडणाऱ्याला वाचवणार रोबोटिक वॉटर रेस्क्यू डिव्हाइस; रिमोटने कंट्रोल, सुखरूप किनाऱ्यावर आणणार

मुंबईच्या समुद्रात बुडणाऱ्याला वाचवून सुखरूपणे किनाऱ्यावर आणणारे रोबोटिक वॉटर रेस्क्यू डिव्हाइस आता पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात येणार आहे. रिमोट कंट्रोलने हाताळण्यात येणाऱ्या या रोबोटिक डिव्हाइस 200 किलोपर्यंत वजन पेलू शकणार आहे. हे डिव्हाइस रिमोट कंट्रोलने बुडणाऱ्यापर्यंत नेले जाईल आणि यानंतर त्याने हे डिव्हाइस पकडल्यानंतर त्याला सुखरूपपणे किनाऱ्यावर आणण्याचे कामही करणार आहे. या डिव्हाइसच्या पुरवठ्यासाठी पालिकेने जागतिक निविदा मागवल्या आहेत.

मुंबईला सुमारे 145 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्रकिनारा लाभला आहे. हा समुद्रकिनारा मुख्यत्वे कुलाबा येथे सुरू होऊन गोराई आणि तेथून पुढे मुंबई महानगर प्रदेशात पसरलेला आहे. नागरिक व पर्यटकांना समुद्रकिनारी पर्यटन किंवा फिरण्यासाठी मुंबईत सहा चौपाटी उपलब्ध आहेत. यापैकी गिरगाव आणि दादर चौपाटी शहर विभागामध्ये तर जुहू, वर्सेवा, अक्सा आणि गोराई या चौपाटी पश्चिम उपनगरात आहेत.

मुंबई महानगरातील समुद्रकिनारी व चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यांनी पोहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने समुद्रात शिरू नये यासाठी पालिकेच्या वतीने सातत्याने जनजागृती केली जाते. तरीदेखील काही नागरिक समुद्रात जातात व प्रसंगी बुडण्याच्या घटना घडतात. अशा घटना घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता अधिक सबळ होण्यासाठी मुंबईतील सहा चौपाट्यांच्या ठिकाणी आधीपासून 94 लाइफ गार्ड तैनात असतात. आता आणखी 26 सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर आता बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी रोबोटिक वॉटर रेस्क्यू डिव्हाइस आणले जाणार आहे.

भुवनेश्वर आयआयटीची संकल्पना

चौपाट्यांवर अद्ययावत वॉटर रेस्क्यू रोबोटिक डिव्हाइसबाबत अग्निशमन दलाकडे ओडिशा भुवनेश्वर आयआयटीने प्रेझेंटेशन देत संकल्पना विषद केली होती. त्यानुसार हे डिव्हाइस घेण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. यानुसार क्षमतेच्या अटींची पूर्तता करणाऱ्याला हे डिव्हाइस पुरवता येणार आहे. हे डिव्हाइस बॅटरीवर चालणारे रिमोटने सेन्सरद्वारे कंट्रोल होणारे असेल. या डिव्हाइसचा ताशी वेग जाताना 16 ते 18 किमी तर येतानाचा वेग ताशी 12 ते 13 किमी असेल.