देशभारातून आत्महत्येची प्रकरणे दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या कठीण परिस्थितीवर मात करून काहीजण वर येतात तर काही जण निराश होऊन आत्महत्येचा पर्याय निवडतात. मात्र तुम्ही कधी एकलंय का की कोणत्या प्राण्याने, पक्ष्याने किंवा यंत्राने आत्महत्या केलीय. मात्र आता आत्महत्येचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका रोबोटने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. एखाद्या रोबोटने आत्महत्या करण्याचे कदाचित हे पहिलेच प्रकरण असावे. दक्षिण कोरियाच्या स्थानिक वृत्तपत्रांनी ही बातमी दिली आहे.
आत्महत्या केलेला हा रोबोट महापालिकेच्या कामात मदत करत होता, अशी माहिती डेली मिररने वृत्तातून दिली आहे. हा रोबोट गुमी शहरातील रहिवाशांना सुमारे वर्षभर प्रशासकीय कामात मदत करत होता. गेल्या आठवड्यात तो पायऱ्यांच्या खाली बेशुद्धावस्थेत सापडला होता. रोबोट पडण्यापूर्वी सारखा फेऱ्या घालत होता, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या रोबोटला कामाचा प्रचंड ताण असल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रोबोटच्या अशा विचित्र अपघातावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. हा रोबो अधिकृतपणे शहर पालिकेचा भाग होता. आम्ही त्याला नेहमी आमच्यातलाच एक कर्मचारी मानलं आहे. कॅलिफोर्नियातील बेअर रोबोटिक्सने विकसित केलेला हा रोबोट सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करायचा आणि त्याचे स्वतःचे सार्वजनिक सेवा कार्डही होते, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.