क्रिकेट विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता रॉबिनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रॉबिनवर प्रोविडेंट फंड घोटाळ्याचा आरोप असून पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी हे वॉरंट जारी केले आहे. या बातमीमुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रॉबिन उथप्पा सेंचुरीज लाइफस्टाइल ब्रांड प्राइवेट लिमिटेड या कंपनीत व्यवस्थापन करत आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रॉबिनने कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापला मात्र ते पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे मिळाले नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. या प्रकरणातून एकूण 23 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप रॉबिन उथप्पावर आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी 4 डिसेंबर रोजी पुलकेशीनगर पोलिसांना पत्र लिहिले होते. या पत्रात रॉबिनविरोधात तक्रार केली असून अटक वॉरेंट जारी करुन लवकरात लवकर रॉबिनला अटक करावी असे लिहिले होते. मात्र उथप्पाने त्याचे निवासी स्थान बदलल्यामुळे पोलिसांनी ते वॉरंट पीएफ ऑफिसला परत केले. त्यामुळे अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
रॉबिन उथप्पा हा टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू आहे. रॉबिनने निवृत्तीपूर्वी देशासाठी एकूण 59 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सात अर्धशतके आहेत.