
पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीने नगर शहर आणि उपनगरी भागात मागील आठवड्यात तीन ठिकाणी सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर आता ग्रामीण भागातही ही टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी एकप्रकारे आव्हान निर्माण केले आहे. तसेच, याबाबत पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दुचाकीवर चाललेल्या 60 वर्षीय वृद्धाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रस्त्यात अडवून पोलीस असल्याची बतावणी करत हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पळवून नेल्याची घटना सुपा ते पारनेर रोडवर 12 फेब्रुवारीला घडली आहे. याबाबत बबुशा बोरुडे (रा. पुणेवाडी, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मागील आठवड्यात अहिल्यानगर शहर परिसरात चार दिवसांत तीन लुटीच्या घटना घडल्या होत्या. शहरातील नवीन टिळक रोडवर 6 फेब्रुवारीला सायंकाळी मोपेडवरून घरी चाललेल्या मीनाबाई बाळासाहेब शिरसाठ (वय 40, रा. सारसनगर) यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे 1 लाख 29 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीवर आलेल्या दोघांनी हिसकावून नेले. त्या पाठोपाठ एमआयडीसीमधील उद्योजक राजाराम राय (वय 62) यांना 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आनंदधाम स्स्त्यावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी अडवून पोलीस असल्याची बतावणी करून गळ्यातील चेन आणि अंगठ्या काढून ठेवा म्हणत त्यांची नजर चुकवून ते दागिने लंपास केले होते.
9 फेब्रुवारीला सायंकाळी पाईपलाईन रोडवर दीपक आंबेकर (वय 67, रा. श्रीकृष्णनगर, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) यांना थांबवत एक कार्ड दाखवून ‘मी पोलीस आहे. तुमच्या गळ्यातील चेन व अंगठी काढून द्या,’ असे म्हणत ते दागिने घेऊन दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी पोबारा केला होता. यातील एकाही घटनेचा तपास अद्यापि पोलिसांना लागलेला नाही. त्यातच आता ग्रामीण भागातही अशी टोळी सक्रीय झाल्याने पोलीस यंत्रणेपुढे या टोळीने मोठे आव्हान उभे केले आहे.