मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या तारे कुटुंबीयांच्या गळ्यावर सुरा ठेवत महिलेच्या अंगावरील दागिने दरोडेखोरांनी लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीच्या खांडपे-चिंचवली गावात घडला आहे. कोणालाही फोन करू नये म्हणून दरोडेखोरांनी घरातील सर्व मोबाईलचा डिसप्ले फोडून पाण्यात टाकले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
खांडपे-चिंचवली गावातील अजित तारे हे कुटुंबासह राहतात. गुरुवारी रात्री गाढ झोपेत असताना चार दरोडेखोर बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून घरात शिरले, पिस्तूल, सुरा आणि लोखंडी सळईचा धाक दाखवून घरातील तिन्ही व्यक्तींचे हात, पाय बांधून एका खोलीत बंद केले. त्यानंतर चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करत संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. मात्र त्यांना काहीच सापडले नाही. अखेर त्यांनी आपला मोर्चा खोलीत डांबून ठेवलेल्या महिलांकडे वळवला. घरातील मोबाईलचे डिस्प्ले फोडून पाण्याच्या हंड्यात टाकले. महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवून कर्णफुले आणि गंठण चोरट्यांनी हिसकावले. यावेळी आम्हाला मारू नका, तुम्हाला काय न्यायचे ते न्या अशी आर्जव महिलांनी केली.
चार भाषांमध्ये संवाद
चारही दरोडेखोर आदिवासी, मराठी, हिंदी आणि तामीळ भाषेत संभाषण करत असल्याची माहिती तारे कुटुंबीयांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्कॉट, ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला असून तालुका पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.