‘डेटिंग अॅप ‘द्वारे लुटमार करणाऱ्या सराईत टोळीला बेड्या; चार गुन्हे उघडकीस

प्रातिनिधिक फोटो

‘डेटिंग अॅप’ सह मोबाईलमधील नवनवीन अॅपच्या माध्यमातून संपर्कात येणाऱ्या तरुणांना बोलावून घेत, त्यांची मोबईल रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी शिक्रापूर परिसरात तीन, लोणीकंदमध्ये एक असे चार लुटमारीचे गुन्हे केले आहेत. त्याद्वारे त्यांनी 80 हजार रुपये लुटल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सुशांत पोपट नागरे (वय 25, रा. प्रेमभारतीनगर, बोल्हेगाव, ता. जि. नगर), मयूर राजू गायकवाड (वय 24, बोल्हेगावनगर), श्रेयस भाऊसाहेब आंग्रे (वय 24, रा. संभाजीनगर, नागापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी मयूर याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपी सुशांतवर एक गुन्हा दाखल आहे. दोघेही रेकॉर्डवरील आरोपी आहेत.

तरुणांना ‘डेटिंग अॅप’द्वारे जाळ्यात अडकवून त्यांची लुटमार केल्याचे गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल होते. अशाच प्रकारे रस्त्यात थांबलेल्या तरुणाला मुंबईला जाण्याचा पत्ता विचारण्याच्या चार गुन्हे उघडकीस बहाण्याने टोळक्याने त्यांचे 10 ऑक्टोबरला अपहरण केले. आरोपी हे कारेगाव येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी उतरले असता, तरुणाने मोटारीतून उतरून सुटका करून घेतली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मोटारीच्या क्रमांकानुसार नगर जिल्ह्यातील सराईत सुशांत नागरे याची माहिती पथकाने घेतली. त्यानंतर पथकाने तिघांना ताब्यात घेत मोटार जप्त केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, उपनिरीक्षक अमित सिदपाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ यांनी केली.

मोबाईलमधील डेटिंग अॅपसह अॅपद्वारे संपर्कात येऊन इतर नागरिकांची लुटमार करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. दरम्यान, अशाच प्रकारे फसवणूक झालेली असल्यास किंवा ब्लॅकमेल केले जात असल्यास नागरिकांनी स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी.
– पंकज देशमुख,
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

अशी करीत होते लुटमार
■ आरोपी हे मोबाईलमधील ‘ग्रिंडर’ डेटिंग अॅपचा वापर करीत होते. अॅपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्याचे लोकेशन घेतले जात होते. त्याठिकाणी पोहचून आरोपी समोरील व्यक्तीस सोबत घेत होते. त्याचे नग्न फोटो घेऊन, भीती घालून रक्कम उकळली जात होती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मोटारीच्या क्रमांकावरून आरोपींचा माग काढला. त्यांना अटक करून चार गुन्ह्यांची उकल केली आहे.