दरोडा घालताना पाहिल्याने दरोडेखोरांचा दोघींवर अ‍ॅसिडहल्ला, श्रीरामपुरातील धक्कादायक घटना

श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथील माजी सरपंच बाबासाहेब आठरे यांच्या घरी तीन दिवसांपूर्वी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला. यावेळी त्यांची सून हर्षदा यांनी आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोर पळून गेले. मात्र, आरडाओरडा करणाऱ्या महिलेने आपल्याला ओळखले असावे, असा समज झाल्याने अज्ञात दरोडेखोरांनी काल सायंकाळी हर्षदा व आठरे यांच्या पुतणीवर अॅसिड फेकण्याची घटना घडली. यात दोघीही जखमी झाल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

फत्त्याबाद येथील बाबासाहेब आठरे यांच्या घरावर रविवारी (दि. 20) रात्री दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. पहाटेच्या सुमारास दरोडखोर बंद दरवाजा तोडून घरात घुसले. त्यांनी सर्वांच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यावेळी त्यांची सूनबाई हर्षदा आठरे या बाथरूमला गेल्या होत्या. दरोडेखोरांनी सामानाची उचकापाचक सुरू केली. काही दागिन्यांचे गाठोडे आणि थोडी रोकड घेतली. याचवेळी हर्षदा या बाथरूममधून बाहेर आल्या.

दरोडेखोरांना पाहून त्यांनी आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजारी राहणारे आठरे यांचे पुतणे गणेश आठरे व चेतन आठरे हे धावत आले. हे पाहून दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने असलेले गाठोडे खाली फेकत दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या आणि ते पळून गेले. परंतु हर्षदा यांनी आपल्याला ओळखले असावे, असा चोरट्यांचा समज झाला. त्यामुळे हे दरोडेखोर दोन दिवसांपासून हर्षा यांच्या मागावर होते.

सोमवारी त्यांनी हर्षदाला वीट फेकून मारली. मात्र, सुदैवाने त्या बचावल्या. काल हर्षदा आपल्या मुलीला घेऊन फत्त्याबाद येथे दवाखान्यात आली होती. सोबत बाबासाहेब आठरे यांची पुतणी होती. दवाखान्यातून स्कुटीवरून घराकडे येत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी स्कुटीवर चाललेल्या दोघींवर अॅसिड फेकले. त्यात हर्षदा यांची पाठ भाजली, तर आठरे यांच्या पुतणीच्या छातीला भाजले आहे.

दोघींना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सलग दोन दिवस या महिलेवर हल्ला झाल्याने आरोपी जवळपासचेच असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.