मुंबईत रस्त्यावरील धुळीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी रस्ते धुलाई सुरू करण्यात आली असून येत्या 1 डिसेंबरपासून सर्व वॉर्डांमध्ये ही कार्यवाही वेगाने करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत 35 टँकरच्या सहाय्याने पालिकेचा घन कचरा विभाग आणि पंत्राटदाराच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेच्या अखत्यारीत असणाऱया 2 हजार किमी रस्त्यापैकी दररोज किमान एक हजार किमी रस्ते धुण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे समजते.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्त्यांवरील धूळ प्रमुख कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने हवेतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांना गती दिली आहे. यामध्ये गतवर्षीपासून पालिकेने मुंबईत ‘डीप क्लिनिंग’ मोहीम सुरू केली आहे. या वर्षीही नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच ही मोहीम पालिकेच्या स्तरावर सुरू करण्यात आली आहे.
पुनर्प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर
रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या आणि स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत नाही. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीमध्ये (ऑफ- पीक अवर्स) मध्ये विशेषतः पहाटे 3 ते सकाळी 6 दरम्यान रस्ते धुण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात हे काम केले जात आहे.