मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रखडलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे 1 ऑक्टोबरपासून सुरू करून 31 मे 2025 पर्यंत म्हणजेच 240 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रस्त्याची कामे करताना दर्जा, गुणवत्ता यांच्याशी कदापि तडजोड केली जाणार नाही, याची दक्षता घ्या, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले. शिवाय काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यापूर्वी रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करा, उपयोगिता सेवा वाहिन्या संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवा आणि 31 मे 2024 पर्यंत सिमेंट-काँक्रीटीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे निर्देशही बांगर यांनी दिले.
एका रस्त्याचे काम पूर्ण करण्यास 45 दिवस
सिमेंट-काँक्रीट रस्ते बनवण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणतः 30 ते 45 दिवसांचा कालावधी जातो. दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील काँक्रीटीकरण रस्त्यांची यादी तयार करावी. प्रत्येक महिन्यांचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. त्याचा सुयोग्य पाठपुरावा करावा. रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. जो रस्ता अपूर्णावस्थेत आहे तो रस्ता प्राधान्याने पूर्ण करावा. अपूर्णावस्थेतील रस्ते पूर्ण करूनच नवीन काम काम हाती घ्यावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.