पंतप्रधान ग्रामसडक योजनेला भ्रष्टाचाराची कीड: डहाणूत पहिल्याच पावसात आठ कोटींचा रस्ता गेला वाहून

डहाणूत पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तयार केलेला आठ कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी, गंजाड, आवढाणी मार्गे डहाणू – जव्हारला जोडणारा हा रस्ता आहे. तो पहिल्याच पावसात खचल्याने चारोटी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे तासन्तास होणाऱ्या लटकंतीमुळे प्रवासी व नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याला भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे रस्ता वाहून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

घानिवरी, गंजाड, आवढाणी मार्गे डहाणू जव्हारला जोडणाऱ्या या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था होऊन भलेमोठे खड्डे पडले होते. अतिदुर्गम भागातील नागरिक व नागरिकांना डहाणूकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्याने तो नव्याने तयार करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. अखेर पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आठ किलोमीटरचा हा रस्ता नव्याने तयार करण्यात आला. या रस्त्यासाठी 8 कोटी 25 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता.

  • लोकसभा निवडणुकीच्या आधी मिंधे गटाचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी गाजावाजा करत या रस्त्याचे भूमिपूजन केले होते.
  • अवघ्या दोन ते तीन महिन्यांत हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र काही दिवसांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसाने या योजनेची पोलखोल केली आणि नव्याने तयार केलेला रस्ता पहिल्याच पावसात खचला.
  • अधिकारी आणि ठेकेदाराने संगनमत करून भ्रष्टाचार करून नित्कृष्ट दर्जाचा रस्ता तयार केल्याने ही अवस्था झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून धानिवरी – गंजाड रस्ता तयार केला. पण ठेकेदाराने जुन्या संरक्षण भिंतीवरच नवीन भिंत बांधून या रस्त्याचे बांधकाम केले. त्यामुळे जुनी संरक्षण भिंत खचल्याने हा रस्ता खचला. हे निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे आम्ही अधिकारी व ठेकेदार यांच्या निदर्शनास आणून दिले होते. पण त्यांनी दुर्लक्ष केले होते. आता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तो ताबडतोब दुरुस्त करावा.

– शैलेश तांबडा, ग्रामस्थ, धानिवरी

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तयार केलेला रस्ता काही ठिकाणी खचला असून तेथे ठेकेदाराकडून दुरुस्ती केली जाईल. नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी त्वरित या रस्त्याचे काम करण्यात येईल.

– प्रकाश चोपडे, अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना, पालघर