
डोंबिवलीतील मोठागाव खाडीकिनारी रो-रो बोट सेवा सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यामुळे रो-रो बोटसाठी जेट्टीच्या कामाचा नारळ आज फुटला. मोठागाव खाडीकिनारी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जेट्टीचे भूमिपूजन करण्यात आले. या रो-रो बोट सेवेमुळे डोंबिवलीहून वसई, विरार, मुंबई आणि नवी मुंबईपर्यंतचा प्रवास वाहनांसह करता येणार आहे.
2018 मध्ये या रो-रो बोट मार्गाची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी एकूण 1 हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला होता. त्यातील प्राथमिक स्वरूपात 80 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून डोंबिवली मोठागाव जेट्टीसाठी 22 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ताण कमी होणार
रो-रो बोट सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून इंधन खर्चात मोठी बचत होईल. तसेच रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरही आळा बसणार आहे. या प्रकल्पामुळे डोंबिवलीच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून नागरिकांना वेगवान आणि सोयिस्कर प्रवासाची सुविधा मिळणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिली.
अवघ्या 25 मिनिटांत नवी मुंबई
डोंबिवली मोठागाव येथे तयार होणाऱ्या जेट्टीमध्ये तीन मजली ट्रॅफिक पार्किंग स्टेशन उभारले जाणार आहे. रो-रो बोट सेवा डोंबिवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवासासाठी वापरण्यात येणार आहे. हा प्रवास सुमारे साडेसात ते आठ किलोमीटर अंतराचा असून अवघ्या 25 मिनिटांत नवी मुंबई गाठता येणार आहे.