
मुख्यमंत्री नितीशकुमार हे गंजेडी आहेत. ते विधिमंडळात भांग पिऊन येतात. ते सभागृहात महिलांचा अपमान करतात, असा जोरदार हल्ला राजदच्या नेत्या राबडी देवी यांनी केला. यामुळे विधिमंडळात गोंधळ उडाला.
बिहार विधानपरिषदेत मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राबडी देवी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. राबडी देवींकडे बोट करून नितीशकुमार म्हणाले, या लोकांच्या काळात राज्यात काही कामे व्हायची का? 2005च्या आधी राज्यात कोणी कपडे परिधान करत नव्हते. आम्ही सत्तेत आल्यावर सगळी कामे केली. हिंदू-मुस्लिम तेढ संपवली. महिलांना आरक्षण दिले.
2005च्या आधी त्यांच्या घरातील लेकी-बाळी कपडे परिधान करत नव्हत्या का?
नितीशकुमार यांच्या वक्तव्यावर राबडी देवी यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर संताप व्यक्त केला. राजद आमदारांनी सभात्याग केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून राजद आमदारांनी घोषणाबाजी केली. राबडी देवी म्हणाल्या, नितीशकुमार गंजेडी आहेत. विधिमंडळात भांग पिऊन येतात. महिलांना काहीही बोलतात. नेहमी महिलांचा अपमान करतात. मला नितीशकुमार आणि त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारायचे आहे की, त्यांच्या घरातील लेकी-बाळी 2005च्या आधी कपडे परिधान करत नव्हत्या का? 2005च्या आधी बिहारचा विकास झाला नव्हता का? नितीशकुमार 2005 नंतर जन्माला आलेत का? असा मुख्यमंत्री असतो का? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.