रियान परागला 12 लाखांचा दंड!

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यानंतर आता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागवरही ‘बीसीसीआय’ने 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुद्ध गुवाहाटीत झालेल्या सामन्यात निर्धारित वेळेत 20 षटके गोलंदाजी पूर्ण न केल्याने कर्णधार या नात्याने रियानवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आयपीएलच्या 18व्या हंगामात 11व्या सामन्यापर्यंतच दोन संघांच्या कर्णधारांवर निर्धारित वेळेत 20 षटके गोलंदाजी पूर्ण न केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलच्या आचारसंहिता कलम 2.22 नुसार एका हंगामातील उल्लंघनाच्या वाढत्या संख्येनुसार दंडाची रक्कम वाढत जाते. हार्दिक पंड्या व रियान पराग यांना पहिल्यांदा नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एखाद्या संघाकडून दुसऱयांदा निर्धारित वेळेत 20 षटके गोलंदाजी पूर्ण न झाल्यास कर्णधाराला 24 लाख रुपये दंड, तर इतर 10 संघ सहकाऱ्यांना प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा सामना शुल्काच्या 25 टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती भरावी लागेल. तिसऱयांदा असेच नियमांचे उल्लंघन झाल्यास कर्णधाराला 30 लाख, तर इतर 10 संघ सहकाऱयांना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा सामना शुल्काच्या 50 टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती दंड म्हणून भरावी लागते.