निवडणुकीसाठी सुनक यांची हिंदूंना साद; म्हणाले, संसद सदस्य म्हणून गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्याचा अभिमान

rishi-sunak-uk

ब्रिटनमधील 4 जुलैच्या निवडणुकांपूर्वी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हिंदू धर्माबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. धर्म माझा मार्गदर्शक आहे, संसद सदस्य म्हणून भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्याचा अभिमान आहे, असे सुनक यांनी म्हटले आहे.

विविध मंदिरांमध्ये सुनक आणि अक्षता या जोडप्याने दर्शन यात्रा सुरू केल्यानंतर विरोधी पक्षाचे नेतेही मंदिरांचे दौरे करू लागले आहेत. मी हिंदू आहे आणि मलाही तुमच्याप्रमाणे माझ्या श्रद्धेतून प्रेरणा आणि शक्ती व समाधान मिळते, असे त्यांनी लंडनमधील नेस्डेन मंदिरात पूजा केल्यावर सांगितले. सुनक यांचा वाहनांचा ताफा शनिवारी मंदिर परिसरात पोहोचताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सुनक यांनी मंदिरातील भाविकांशी संवाद साधताना हिंदू धर्माची महती सांगितली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयाने केली. आज क्रिकेट सामन्याच्या निकालाने तुम्ही आनंदी असाल, असे सुनक म्हणाले. यावर जमावाने टाळ्यांचा कडकडाट केला. सुनक आणि अक्षता यांनी यावेळी मूर्तीवर जलाभिषेक केला. त्यांच्याप्रमाणेच मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनीही लंडनमधील अन्य एका मंदिरात जलाभिषेक आणि पूजा केली.

हिंदूंची मनधरणी

स्टार्मर यांनी आपल्या भाषणात किंग्सबरी मंदिराचे वर्णन करुणेचे प्रतीक म्हणून केले. जर त्यांनी निवडणूक जिंकली तर त्यांचे सरकार ब्रिटिश भारतीय समुदायासाठी काम करेल. ब्रिटनमध्ये हिंदूफोबियाला स्थान नाही. देशाचे तुकडे करणे किंवा तोडण्याचे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही. स्टार्मर यांनी सत्तेत आल्यास सर्व धर्माच्या नेत्यांसोबत एकत्र काम करण्यास तयार असल्याचे सांगितले.