पंत नव्हे, दंतकथेतला फिनिक्स!

>> द्वारकानाथ संझगिरी

ऋषभ पंतने राखेतून जन्मणाऱया काल्पनिक फिनिक्स पक्ष्याला कॉम्प्लेक्स दिलाय. त्याचं पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे काल्पनिक वाटावं इतपं अचाट आहे. त्याचं भयाण कार अपघातातून वाचणं जेवढं अविश्वसनीय होतं, तेवढं पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला आईला भेटायला निघालेल्या पंतला डेहराडून-दिल्ली रस्त्यावर रुरकीजवळ अपघात झाला. त्याला रात्री डुलकी लागली आणि त्याने गाडी ठोकली. पुढे आधी डेहराडून आणि नंतर मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार झाले त्याला नंतर डॉक्टरांनी सांगितलं, ‘तू जिवंत आहेस हाच चमत्कार आहे.’ त्या मती गुंग करणाऱया क्षणीही त्याच्या लक्षात आलं की, त्याचा उजवा पाय उलटय़ा दिशेला काटकोनात वाकडा झालाय. त्याने त्याला मदत करणाऱया तिथल्या माणसाच्या आधाराने तो चक्क सरळ केला. पुढे डॉक्टर त्याला म्हणाले, ‘तुला तसं करणं सुचलं ते बरं झालं, नाहीतर तो कापावा लागला असता.’ गुडघ्याच्या लिगामेंट्सचं ऑपरेशन केलं गेलं. त्याच्या चेहऱयावर प्लास्टिक सर्जरी केली गेली. पण त्या अपघातानंतरच्या पहिल्या काही दिवसांत त्याला मैदान, क्रिकेट खेळणं आता इतिहासजमा झालं असं वाटलं असावं.

सुरुवातीला त्याला गादीवर बसून पाय टेकवता येत नव्हता. मग त्याने आधाराने उभे राहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 15- 20 सेपंदांत त्याला कसोटी सामना खेळल्यासारखा दम लागायचा. अनेकांना क्रिकेट खेळणे ही पुढच्या जन्मीची गोष्ट वाटली असती. पण प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्याने पुन्हा मैदानात पाय ठेवला. डॉक्टरांना वाटत होतं की, त्याला बरं व्हायला किमान दोन ते तीन वर्षे लागतील. तो 14 महिन्यांत खेळायला लागला. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये त्याने 253 षटके यष्टिरक्षण केलं. जवळपास 158 च्या सरासरीने 446 धावा केल्या. 16 विकेट यष्टीमागे टिपले, 25 षटकार ठोकले. फिनिक्स पक्ष्यालाही स्फूर्ती मिळाली असती. आणि परवा हिंदुस्थान- पाकिस्तान या मानसिक शक्तीचा कस पाहणाऱया सामन्यात त्याने सर्वाधिक 42 धावा ठोकल्या व 3 झेल घेतले. शारीरिकदृष्टय़ा कुठेही कमी वाटला नाही. जणू अपघात त्याच्या आयुष्यात झालाच नव्हता असं वाटलं. बस, ते एक दुःस्वप्न होतं!

पूर्वी अनेक मोठे खेळाडू अशा अपघातातून जिद्दीने बाहेर येऊन मोठं क्रिकेट खेळले आहेत. टायगर पतौडीचा एक डोळा गेला होता. पुढे आयुष्यभर तो मोठं आंतरराष्ट्रीय क्रिकेट एका डोळय़ाने खेळला. इंग्लंडच्या ब्रायन क्लोज या फलंदाजाच्या मते टायगरचे दोन डोळे शाबूत असते तर तो विव्ह रिचर्ड्सएवढा मोठा फलंदाज झाला असता. 1957 साली गॅरी सोबर्सच्या कारचा अपघात इंग्लंडमध्ये झाला. तो इतका भीषण होता की, वेस्ट इंडीजचा एक अत्यंत गुणवान खेळाडू कॉली स्मिथ त्यात गेला. गॅरी वाचला. त्याचे सर्व विक्रम आणि त्याच इतिहासातला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू होणं हे त्यानंतरचं आहे. स्मिथ त्याचा जीवलग मित्र. गॅरी म्हणतो, ‘कॉलीचा आत्मा माझ्यात शिरला. त्यामुळे मी विक्रम करू शकलो.’ अशा अपघातातून आलेला माणूस अधिक कणखर बनतो. त्याने मृत्यू जवळून पाहिलेला असतो, वेदना सहन केलेल्या असतात. त्याला अपघातातून सावरताना कुणीतरी विचारलं, ‘तू अपघातामुळे मैदानावरचं काय मिस करतोस? तो म्हणाला, ‘षटकार ठोकणे.’

आक्रमकता त्याच्या नसानसात आहे. आक्रमक, बेडर फलंदाज हे वरदान आहे, पण आक्रमकतेलाही थोडी शिस्त पाळावी लागते. साहसी असावं, पण साहसाचं रूपांतर बेदरकारपणात होऊ नये. साहस आणि बेदरकारपणा यातली रेष महत्त्वाची. ती अस्पष्ट होऊ नये. पाच खेळीत दोन अपयश साहसात स्वीकारली जातात, पण तीन नाही.

लहानपणी मी एक वाक्य वाचलं होतं. कुणी लिहिलं ते आठवत नाही. ‘त्या काळी फक्त वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज आक्रमकपणे खेळत.’
” A strokemaker may fail once , he may fail twice, he can not fail always. And success of the strokemaker is the greatness of the game.”