
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ातील पहिले उभे रिंगण आज माळीनगर येथे रंगले. आजच्या नेत्रदीपक रिंगण सोहळय़ात वारकरी-भाविक भक्तिरसात चिंब झाले होते. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण पानीवपाटी (खुडूस) येथे भक्तिरसात पार पडले. लाखो वैष्णवांनी हे रिंगण सोहळे व पाठशिवीचा खेळ आपल्या नयनात साठवून ठेवला.
हरिनामाचा गजर करीत माळीनगरच्या वेशीवर ‘स्टार रेसिडेन्सी’च्या समोरील रस्त्यावर रंगलेल्या उभ्या रिंगण सोहळय़ाने आसमंतही भक्तिरसात चिंब झाला. अकलूजकरांच्या दिवसभरातील आदरातिथ्याचा भक्तिपूर्ण निरोप घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ाने आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास माळीनगर वेशीवर प्रवेश केला.
आळंदी येथून प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज सकाळी माळशिरसकरांचा निरोप घेऊन खुडूसच्या दिशेने प्रस्थान ठेवले. दोन्ही रिंगण सोहळ्यात अश्वाच्या दौडीवेळी भाविकांनी हरिनामाचा एकच जयघोष केला. वीणेकरी, टाळकरी यांनी रिंगणात वेगळाच भक्तिरंग भरला. मानाच्या अश्वाने दौड पूर्ण केल्यानंतर पुन्हा हरिनामाचा गजर करीत उभे रिंगण संपले. रिंगण सोहळय़ानंतर फुगडय़ा, पावल्या, काटवट, हुतूतू आदी पारंपरिक खेळ खेळण्यात महिला व पुरुष वारकरी देहभान विसरून मग्न झाले.