
राज्यातल्या ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सीचालकाना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाला विविध माध्यमातून देणगी स्वीकारण्यास मुभा दिली आहे. मात्र कायदेशीर मार्गाने देगणी स्वीकारता येईल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी राज्य सरकारने कल्याणकारी मंडळ स्थापन केल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या मंडळाची कार्यपद्धती व कामकाजाबाबतची नियमावली राज्याच्या गृह विभागाने आज जारी केली आहे. या मंडळामार्फत चालकांना जीवन विमा, अपंगत्व विमा योजना आरोग्य लाभ, वाहन चालवताना दुखापत झाल्यास अर्थयोजना, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य योजना राबवण्यात येणार आहे.
या मंडळाने निधी कशा प्रकारे उभारता येईल याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मंडळाला विविध स्वरूपाच्या देणग्यांमार्फत निधी उभारता येईल. त्याशिवाय नोंदणी शुल्क, ओळखपत्र शुल्क, वार्षिक सभासद शुल्काच्या माध्यमातून निधी गोळा करता येईल. त्याशिवाय केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त होणाऱया अनुदानाच्या माध्यमातून निधी उभारता येईल.
कशा प्रकारे निधी उभारता येईल
मंडळास योग्य वाटेल अशा कायदेशीर मार्गाने निधी देणगी स्वरूपात कायदेशीर मार्गाच्या स्रोतातून निर्माण करता येईल. उदाहरणार्थ जिल्हा वार्षिक नियोजन योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठानामार्फत निधी, राज्यातील विविध महामंडळे, आमदार निधी, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत निधी जमा करता येईल.