जगातील सर्वात श्रीमंत भिकारी मायानगरीत; मुंबईत 1.4 कोटींचे फ्लॅट, मुले कॉन्व्हेंट शाळेत, पुण्यात आलिशान घर

कोई भी धंदा छोटा नही होता, धंदे से बडा कोई धरम नही होता. हा अभिनेता शाहरुख खानचा डायलॉग अनेकांनी ऐकला असेल. परंतु खरंच मुंबईतील एका भिकाऱ्यांने हा डायलॉग करून दाखवला आहे.

भरत जैन असं या भिकाऱ्यांचं नाव असून त्यांनी मुंबईत भीक मागून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली आहे. भरत जैन हे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदान यासारख्या ठिकाणी भीक मागतात. राहायला ते परळ भागात आहेत. भरत यांचं शिक्षण आर्थिक अडचणीमुळे अर्धवट राहिलं. पैशांमुळे पुढचं शिक्षण घेता आलं नाही. परंतु त्यांनी कोणालाही दोष न देता आपला मार्ग निवडला. भीक मागणे हे लोकांच्या लेखी कमीपणाचे वाटत असले तरी भरत यांनी काही वर्षांत जे कमावलं आहे, ते कॉर्पोरेट कंपन्यांत काम करूनही शक्य झालं नसतं. मुंबईत त्यांच्याकडे 1.4 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट आहेत. ठाण्यातही दोन दुकाने खरेदी केली असून ती भाड्याने दिली आहेत. या दोन दुकानांच्या भाड्यातून त्यांना दरमहा 30 हजार रुपये मिळतात. भरत जैन यांची एकूण संपत्ती आणि महिन्याची कमाई ही एखाद्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त आहे. या भिकाऱ्यांची कमाई पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत.

7.5 कोटींची संपत्ती

भरत जैन यांची संपत्ती अंदाजे साडेसात कोटींच्या घरात आहे. त्यांचे कुटुंब एक स्टेशनरीचे दुकान चालवते. त्यातूनही पैशांची कमाई होते. त्यांनी पुण्यातही घर खरेदी करून ठेवले आहे. ते घरसुद्धा भाड्याने दिल्याने त्यातूनही पैसे त्यांना मिळत आहेत. भरत यांचे अर्धवट शिक्षण झाले असले तरी मुलांच्या शिक्षणासाठी काहीच कमी पडू देत नाही. मुलांना त्यांनी कॉन्व्हेंट शाळेत टाकले आहे.

महिन्याला 75 हजार रुपये कमाई

भरत जैन यांची रोजची कमाई दोन हजार ते अडीच हजार रुपये आहे. ते 40 वर्षांपासून भीक मागतात. कोणताही ब्रेक न घेता ते 10 ते 12 तास काम करतात. यातून त्यांना दर महिन्याला कमीत कमी 60 हजार रुपये ते 75 हजार रुपयांची कमाई होते. कुटुंबाला आता आर्थिक स्थैर्य मिळाल्याने बायको आणि मुले भीक मागण्याचा धंदा सोडून द्या, आता आराम करा, असे सांगतात. परंतु भरत जैन हे त्याकडे दुर्लक्ष करतात.