शस्त्रक्रिया करताना झालेल्या संसर्गाने रुग्णाचे लाखोंचे नुकसान

मूतखडा झाला म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर आराम तर पडला नाहीच, पण शस्त्रक्रिया करताना झालेल्या संसर्गामुळे पुन्हा लाखो रुपयांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक भुर्दंड पडला आणि नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. याबाबत रुग्णाला दाद न देणाऱया रुग्णालयाला धडक देत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने दणका दिला आणि जाब विचारला. त्यामुळे रुग्णाला लवकरच नुकसानभरपाई देऊ, असे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले.

खार येथील आर. जी. स्टोन रुग्णालयात गोविंद सावंत यांची काही दिवसांपूर्वी मूतखडय़ाची शस्त्रक्रिया झाली, मात्र शस्त्रक्रियेनंतर आराम पडण्याऐवजी त्यांची तब्येत खूपच बिघडली. त्यामुळे गोविंद सावंत यांनी दुसऱया रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून पुन्हा शस्त्रक्रिया केली.  याबाबत सावंत दांपत्याने शिवसेना भवनमधील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. कक्षाच्या कार्यकारिणीने तातडीने डॉ. रीतीम पटेल यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. डॉक्टरांनी रुग्णालयाची चूक मान्य करत पुढील सात दिवसांत रुग्णाला शक्य असलेली सर्व आर्थिक मदत करून हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी उपाध्यक्ष राजू पाटील, सचिव निखिल सावंत, कक्ष लोकसभा समन्वयक बाजीराव शेवाळे, संजय पावले, कक्ष विधानसभा संघटक अॅड. उपेंद्र लोकेगावकर, कृष्णकांत शिंदे, विक्रम शहा, उपसंघटक विजय पवार, विक्रांत जुवेकर, वॉर्ड संघटक सोहेल शेख, कांदळगावकर उपस्थित होते.