Kolkata Doctor Rape Murder Case – कोलकाताच्या ‘निर्भया’ला 161 दिवसांनी मिळाला न्याय; आरजी कर बलात्कार आणि हत्येप्रकरणी संजय रॉय दोषी

कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने आज मोठा निकाल दिला. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवले आहे. न्यायालयात सुनावणीवेळी पीडितेचे आई-वडील उपस्थित होते. दोषी संजय रॉय याला 20 जानेवारीला म्हणजे येत्या सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

कोलकातामधील या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर संपूर्ण देशात रोष व्यक्त करण्यात आला होता. अनेक शहरांमध्ये पीडितेसाठी कँडल मार्च काढून न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आरजी कर हॉस्पिटलमधील डॉक्टरही अनेक दिवस संपावर गेले होते.

मला खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. मी असं काहीही केलेलं नाही. ज्यांनी केलं त्यांना सोडण्यात येत आहे. यात एक IPS अधिकारीही सामील आहे, असा दावा आरोपी संजय रॉयने न्यायालयात केला. गेल्या वर्षी 9 ऑगस्टला कोलकातामधील सरकारी मेडिकल कॉलेज आरजी करमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या.

दोषी संजय रॉयवर बीएनएस 64,66, 103/1 ही कलमं लावण्यात आली आहेत. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथे सेमिनार रूममध्ये विश्रांती करत असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर गळा आवळून तिची हत्या केली, असा दोषी संजय रॉयवर आरोप आहे. डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी 9 जानेवारीला सुनावणी पूर्ण झाली होती. सुनावणीत 50 साक्षीदांरानी न्यायालयात जबाब दिला.