वेबसीरिज – बॅड कॉप : साधीसोपी, परंतु खुसखुशीत

>> तरंग वैद्य

रोमांचक, परंतु तितकाच मालमसाला असलेली अन् मनोरंजन करणारी ही ‘बॅड कॉप’ मालिका. जुळे आणि त्यांच्यासोबत घडणाऱया घटना ही साधीसोपी, परंतु खुसखुशीत मांडणी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आहे.

वर्ष 1995 मध्ये एक चित्रपट आला होता, ‘करण अर्जुन.’ ह्या चित्रपटाचा संवाद ‘मेरे करण अर्जुन आयेंगे’ खूप यशस्वी झाला होता आणि चित्रपटही. ‘बॅड कॉप’ नावाची आठ भागांची वेबसीरिज डिस्ने हॉटस्टार ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आली आहे. ज्यात मुख्य पात्रांची नावे करण व अर्जुन आहेत आणि त्या चित्रपटाप्रमाणे ह्या मालिकेतही हे दोघे भाऊ जुळे आहेत. अर्थात कथासूत्र ‘करण अर्जुन’ चित्रपटाचे नसून 2017 मध्ये ‘बॅड कॉप’ याच नावाने आलेल्या जर्मन मालिकेवर आधारित आहे.

करण पोलीस सेवेत आहे आणि त्याची बायको पोलीस खात्यात असून ती करणला सीनियर आहे. त्याचा जुळा भाऊ अर्जुन अगदी त्याच्यासारखाच दिसतो, काडीमात्रही फरक नाही. फरक आहे तो त्याच्या वागण्यात. कारण तो छोटय़ामोठय़ा चोऱया करत असतो. साथीला त्याची मैत्रीण किकी असते.

एकदा असेच एकाला लुटून अर्जुन आणि किकी दोघे बाहेर पडतात आणि एका हत्येला साक्षी ठरतात. मरणारा स्वतला वाचवण्यासाठी अर्जुनचा शर्ट धरतो आणि रक्ताचे हात अर्जुनच्या शर्टावर येतात. आता पोलीस आपल्यालाच मारेकरी समजतील ह्या भीतीने अर्जुन पळतो, लपतो आणि आपल्या पोलीस भावाला भेटून सत्य काय आहे ते सांगण्यासाठी जातो. इथे काही गँगस्टर करणवर हल्ला करतात. दोन्ही बाजूंनी बेछूट गोळीबार होतो आणि करण-अर्जुन एकमेकांना वाचवत नदीत उडी मारतात. यातला एक वाचतो आणि दुसऱयाचा मृत्यू होतो. जिवंत असलेला पोलीस का चोर हे सांगण्यापेक्षा ते बघणे मनोरंजक ठरेल.

चोर-पोलीसच्या या खेळात गँगस्टर असणे पण महत्त्वाचे, नाही तर हा उंदीर-मांजराचा खेळ रंगणार कसा? या मालिकेतही एक गँगस्टर आहे, पण तो जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये राहूनच तो आपले काळे धंदे चालवत असतो.

प्रत्येक भाग साधारण अर्ध्या तासाचा असल्यामुळे कंटाळवाणा होत नाही. पाठलागाची दृश्ये चांगली चित्रित केली आहेत. पहिल्या भागाच्या शेवटी करण आणि अर्जुनचे पाण्यात पडण्याचे चित्रीकरणही रंजक आहे. जेलच्या आतील दृश्यांमधून गोष्टीत थोडे फार हास्य आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

चोर, पोलीस, गँगस्टर्सच्या कथेसोबत नवरा-बायकोच्या नात्यावरही भाष्य केले आहे. नवरा-बायको एकाच डिपार्टमेंटमध्ये असले आणि बायको सीनियर असली तर पुरुषी अहंकार कसा दुखावतो हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. माझ्या मनात असे काही नसून हा तुझा गैरसमज आहे हे बायकोला पटवून द्यायचा नवरा प्रयत्न करतो. अशी परिस्थिती खऱया आयुष्यात पण येत असते. त्यामुळे प्रेक्षक त्यात जुळले जातात. प्रत्येक भागात मारामारी, पाठलाग दृश्य, थोडे हास्य असे पेरले आहे की मालिकेची गती कायम राहते.

अभिनयाबद्दल बोलायचे तर ‘बॅड कॉप’ ही मालिका गुलशन देवय्याची मालिका आहे. करण आणि अर्जुनच्या भूमिकेत त्याच्या अभिनयाला खूप वाव आहे आणि त्यान्sढ संधीचे सोने केले आहे. एका व्यावसायिक चित्रपटात असतो तो सर्व मसाला या मालिकेत पेरलेला आहे. म्हणूनच गुलशनला हिरोगिरी दाखवायला छान संधी मिळाली आहे. त्याच्या बायकोच्या भूमिकेत हरलीन सेठीने पोलिसी खाक्या नीट सांभाळला आहे. नवऱया बरोबरच्या तक्रारी, गैरसमज सांभाळत संसार सांभाळायचा प्रयत्न तिने तिच्या अभिनयातून दाखवून दिला आहे. खलनायकाच्या भूमिकेत अनुराग कश्यप आहे, ज्याने आपल्या भूमिकेशी न्याय केला आहे. ऐश्वर्या, सुश्मिता पण ठीक आहे.

कथा रोमांचक आहे आणि दुविधेची परिस्थिती कायम ठेवली आहे, ज्यामुळे शेवटपर्यंत आपले कुतूहल कायम राहते. बरीच दृश्ये बघताना कुठल्या ना कुठल्या सिनेमांची आठवण होते, पण त्यांची सरमिसळ नीट झाली आहे. संवाद अधिक मजेशीर करता आले असते. 21 जून, 2024 पासून ही मालिका डिस्ने

हॉटस्टारवर आली असून करमणूक म्हणून बघायला हरकत नाही.

z [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)