
>> तरंग वैद्य
कॉलेजविश्वातील घडामोडी, विद्यार्थ्यांचे आयुष्य दर्शवणारी ही वेबसीरिज. ठोस कोणताही विषय नसूनही हॉस्टेलमधील आयुष्य, हल्लीच्या मुलांचे विचार, मोबाइल आणि नेटचा वापर व गैरवापर आणि अर्थातच त्याचे फायदे आणि तोटे सांगणारी ही मालिका प्रेक्षकांची थाप मिळवणारी आहे.
महाविद्यालयातील छात्रसंघ, त्यांच्यातील भांडणं, हेवेदावे, अभ्यास, हॉस्टेल, मुलामुलींमध्ये प्रेम, ईर्षा हे कॉलेजवर आधारित सिनेमा किंवा वेबसीरिजचे मुख्य विषय. शिक्षक-विद्यार्थी संघर्ष, मुलं आणि आईवडिलांमधील ‘जनरेशन गॅप’मुळे होणारे वाद वगैरे पण मुद्दे असतात, पण ‘स्वाइप क्राइम’ नावाने कॉलेजविश्वावर आधारित एक वेबसीरिज आली असून यात हे विषय नाहीत. तरीही मालिका प्रेक्षकांची थाप घेऊन जाईल अशी आहे. मॅक्सप्लेअरची ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 20 डिसेंबर 2024 रोजी आली आहे.
मुख्य कथा कॉलेज पाम्पस आणि कॉलेज वसतिगृहात घडते. कॉलेजच्या अॅडमिशनपासून कथेला सुरुवात होते. वसतिगृह, तेथील नियम, विद्यार्थ्यांची राहण्याची तऱ्हा, शिक्षक-विद्यार्थी संवाद दाखवत कथा पुढे सरकते. कॉलेज म्हटलं की, ‘रॅगिंग’ हा प्रकार आलाच, पण इथे ‘रॅगिंग’ खूप छान आणि सकारात्मक पद्धतीने दाखवलं आहे. अशी रॅगिंग सगळीकडे सुरू झाली तर नवीन विद्यार्थ्यांच्या मनातील भीती नाहीशी होईल आणि सीनियर विद्यार्थ्यांबद्दल आदर वाढेल.
कथेत पाच मुलांची एक टोळी मजा-मस्ती करत असताना पकडली जाते आणि त्यांना शिक्षा म्हणून सात दिवसांत एक प्रोजेक्ट बनवून द्यायला सांगितला जातो. ज्यासाठी इतर विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचा कालावधी दिलेला असतो. कॉलेजमध्ये राहायचं असेल तर हे पूर्ण करायला लागणार हे समजून ही मुलं कामाला लागतात. दरम्यान कॉलेजमधील एक हुशार विद्यार्थी उडी मारून जीव देतो. सगळ्यांना मदत करणारा आणि कोणाशीच दुश्मनी नसणारा हा मुलगा मलिक आत्महत्या करेल असं कोणाला वाटत नाही. पोलीस तपास करून ‘आत्महत्या’ असा शेरा मारून केस बंद करतात. त्याचा जिवाभावाचा मित्र विकी मलिकच्या आत्महत्येमागचं कारण शोधायचा प्रयत्न करतो आणि त्याला मिळालेल्या धाग्यादोऱयात मलिकला एक मुलगी
ब्लॅकमेल करत असल्याचं समजतं. ही गोष्ट तो विद्यापीठ प्रमुखांच्या नजरेस आणून देतो. पण नाव खराब होण्याच्या भीतीने ते त्याला गप्प राहायला आणि झाला प्रकार विसरून जायला सांगतात. जे अर्थातच विकी करू शकत नाही. एकट्याच्या बळावर तो त्या मुलीला शोधायचा प्रयत्न करू लागतो. ही मुलगी एका ‘डेटिंग
अॅप’च्या माध्यमातून मलिकला भेटलेली असते. इकडे ही पाच मुलं आपला प्रोजेक्ट म्हणून असा ‘डेटिंग अॅप’ तयार करत असतात. ज्यात खोटेपणा नसतो तर सर्वकाही पारदर्शक असतं जेणेकरून ‘ब्लॅकमेलिंग’सारखे प्रकार घडणार नाहीत. ह्याचबरोबर रोजचे लेक्चर्स, हॉस्टेल आणि कॅन्टीनमधल्या गमतीजमती सुरूच असतात. ज्यामुळे कथेची गती कायम राहते आणि प्रेक्षक कुठेही कंटाळत नाही.
विकी आता आपला अभ्यास विसरून मलिकला ब्लॅकमेल करणाऱया मुलीचा शोध घेण्यासाठी सज्ज होतो. त्याची मैत्रीण आणि त्याच्याच महाविद्यालयातली शिक्षिका पूर्णिमा त्याला यापासून परावृत्त करून अभ्यासात लक्ष घाल असं सांगते. मात्र विकीच्या दृष्टीने अभ्यासापेक्षा न्याय महत्त्वाचा असतो.
इकडे ‘डेटिंग अॅप’ पूर्णपणे तयार होते. नेटवर असलेल्या ‘लव्ह लेन’ या डेटिंग अॅपच्या मालकाला याचा पत्ता लागतो आणि तो त्यांच्या कामात विघ्न आणायचा प्रयत्न करतो. विकी त्या मुलीला पोलिसांपर्यंत पोहोचवतो, पण बदल्यात त्याचे खूप मोठे नुकसान होते.
या वेबसीरिजमध्ये पंचायत वेबसीरिजमुळे प्रसिद्धी झोतात आलेला फैसल मलिक आणि प्रसिद्ध अभिनेता राजेश शर्मा सोडले तर इतर सगळेच चेहरे नवीन आहेत. पण ते नवखे नसल्याचं प्रत्येकाने त्यांच्या अभिनयातून दाखवून दिलं आहे. सगळे त्या विद्यापीठातील छात्र वाटतात. हॉस्टेलमधील आयुष्य, हल्लीच्या मुलांचे विचार, मोबाईल आणि नेटचा वापर, गैरवापर आणि त्याचे फायदे आणि तोटे सांगणारी ही मालिका साधीसोपी असूनही रंजक आहे. फक्त शेवट काहीसा अर्धवट वाटतो.
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)